अहमदनगर : करोना प्रतिबंधक लसीकरण वाढावे, यासाठी अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ लागली आहे. मात्र, कर्जत व जामखेड तालुक्यात यापेक्षा वेगळी युक्ती शोधण्यात आली आहे. तेथे लस घेणाऱ्यांची सोडत काढून त्यातील विजेत्यांना विविध वस्तूंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार यांची संकल्पना आणि पुढाकारातून तालुक्यांच्या ग्रामीण भागासाठी ही सोडत योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ ते २४ डिसेंबर या काळात कर्जत व जामखेड या तालुक्यांत ही सोडत योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या सहभागातून ही योजना आहे. या काळात पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोडतीसाठी पात्र धरण्यात येणार आहे. सोडत काढून विजेत्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास ७० बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात येईल. प्रथम - फ्रीज, द्वितीय - पिठाची गिरणी, तृतीय - टीव्ही, चौथे - ५ पंखे, पाचवे - ५ मिक्सर, सहावे -५ कुकर, सातवे -५ इस्त्री, आठवे - २० टिफिन अशी एकूण ४३ बक्षिसे दिली जाणार आहेत. ही योजना फक्त तालुक्यांच्या ग्रामीण भागासाठी आहे. शहरासाठी नंतर वेगळे नियोजन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील पदाधिकारी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे यांचे सहकार्य आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GD6iyb
https://ift.tt/3IN3pN9
0 Comments