मुंबई: कर्नाटकमधील बेंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळं शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेवर खासदार यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना होते, असं म्हणत या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. बेंगळुरूतील घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. 'दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात अशा प्रकारे विटंबना होते, हे चित्र बेंगळुरूतील आहे. धिक्कार असो, ऊठ मराठा ऊठ!' असं ट्विट त्यांनी केलं. यानंतर राऊत यांनी लगेच दुसरं ट्विट केलं आहे. 'एका बाजूला काशीमध्ये पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करतात आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय. हा संतापजनक प्रकार भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूत घडला आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. हिंदूंनो, आता उठा, जागे होण्याची वेळ आलीय.' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तत्पूर्वी, बेंगळुरूतील सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. काही समाजकंटकांनी केलेल्या या संतापजनक कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. शिवप्रेमींनी रस्त्यावरील वाहतूक बंद केली. बेळगाव शहरात आज 'बंद' पाळण्यात आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारीही आक्रमक झाले होते. कर्नाटकात काही ठिकाणी हॉटेल बंद करण्यात आली होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ejBkiN
https://ift.tt/3mfuLBQ
0 Comments